रशियन सैन्यात मनुष्यबळाची कमतरता; आता सैन्य भरतीसाठी ‘या’ लोकांचीही निवड करण्याची तयारी

मॉस्को – रशिया आणि युक्रेन यांच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता एका नव्या ताज्या अहवालानुसार रशियाच्या लष्करामध्ये बलात्कारी आरोपी आणि एड्स रुग्णांचीसुद्धा भरती करण्यात येत आहे. जगातील तीन प्रमुख संस्थांनी याबाबत माहिती जारी केली आहे.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने, युक्रेनमधील एका प्रमुख वृत्तपत्राने आणि डेली बिस्ट या अमेरिकन वृत्तसंस्थेने याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी लोकांची टंचाई भासत असल्याने रशियन सरकारने आता विविध गुन्ह्यांखाली आरोपी असलेल्या लोकांना लष्करात भरती करण्याचा निर्णय घेतला आहेच शिवाय एड्स किंवा हिपेटायटिस बी यासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची सुद्धा लष्करात भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
या तुकडीला वॅगनार तुकडी अशा नावाने ओळखले जाऊ लागले आहे. युक्रेन बरोबरचा संघर्ष आणखी किती काळ चालू राहिल याबाबत कोणतीही शाश्वती नसल्यानेच लष्कराचे बळ कमी होय होऊ नये म्हणून रशियन सरकारने अशा प्रकारे लष्कर भरती करण्याची निर्णय घेतला आहे.
रशियातील कारावासात बलात्कार किंवा खुनासारख्या गंभीर आरोपाखाली शिक्षा भोगणारे किंवा अनेक रुग्णालयांमध्ये दुर्धर आजारांनी त्रस्त झालेले रुग्ण असोत त्यांना केवळ सीमेवर लढाई करून मरण्यासाठीच लष्करात भरती करण्यात आले आहे असे डेली बिस्ट या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. अशा प्रकारे भरती करण्यात आलेले आरोपी आणि रुग्ण यांची रवानगी रशिया युक्रेन सीमेवरच करण्यात आली आहे.
रशिया सरकारने मात्र अशा प्रकारच्या वृत्तांचा पूर्णपणे इन्कार केला आहे. वॅगनार आर्मी नावाने ओळखली जाणारी ही तुकडी पूर्णपणे खाजगी नियंत्रणाखाली असल्याचीही माहिती समोर येत आहे. अशा प्रकारची कोणती तुकडी जर अस्तित्वात असेल तर त्याच्याशी रशिया सरकारचा कोणताही संबंध नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अनधिकृत माहितीप्रमाणे रशियाचे नेते व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशाप्रमाणेच ही वॅगनार तुकडी नावाची प्रायव्हेट आर्मी काम करत असते. सध्या युद्ध सुरू आहे म्हणूनच ही तुकडी अस्तित्वात आली आहे असे नाही तर गेले सुमारे दहा वर्षे रशियामध्ये ही प्रायव्हेट आर्मी अस्तित्वात असून पुतीन यांच्या आदेशानुसार अनेक महत्त्वाची कामे या तुकडीने पार पाडली आहेत.





