Pune District : कांदा लागवड करण्यासाठी मजुरांची टंचाई

मंचर : आंबेगाव तालुक्यातील विविध गावात कांदा लागवड सुरू असून मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आठवड्यातील ४ दिवस शेती पाणी पुरवठा करणाऱ्या शेती पंपाची वीज रात्री नऊ वाजून ४० मिनिटांपासून तर पहाटे पाच वाजून ४० मिनिटापर्यंत असल्याने कांदा लागवड करणे अवघड झाले आहे.महावितरणने रात्रीच्या वेळी वीज पुरवठा करणाऱ्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे मजुरांची टंचाई जाणवत आहे. आजूबाजूच्या परिसरातून गाडी करून मजूर आणावे लागतात. त्यासाठी वाहतूक खर्च येतो. व मजुरी ही जास्त प्रमाणात द्यावी लागते. वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. चालू वर्षी कांद्याला दर चांगला मिळाला असल्यामुळे कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. नारोडी येथील शेतकरी रामदास एकनाथ हुले यांच्या एक एकर शेतामध्ये कांदा लागवड करण्यात आली असून सुरुवातीला जमीन मशागत, वाफे तयार करण्यासाठी त्यांना पाच हजार रुपये खर्च आला. तसेच लागवडीपूर्वी चार ट्रॉल्या शेणखत पाच हजार रुपये प्रमाणे वीस हजार रुपये खर्च आला.
त्याचबरोबर दाणेदार,सिलिकॉन, सुपरफास्पेट यासाठी पाच हजार रुपये खर्च आला. एक एकर क्षेत्रासाठी सहा किलो कांद्याचे बी २५०० रुपये प्रमाणे विकत घेऊन त्यासाठी पंधरा हजार रुपये खर्च आला. शेतामध्ये लागवड करण्यासाठी पाच जोडी नऊ हजार रुपये एकरी याप्रमाणे खर्च आला. तसेच रोपे उपटण्यासाठी पाच मजूर तीनशे रुपये रोज असे पंधराशे रुपये खर्च आला. एकूण खर्च ५६ हजार रुपये आला असून सध्या वातावरणामध्ये ढगाळ हवामान असून कांदा पिकाला मारक असून कांदा रोप पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते, असे रामदास एकनाथ हुले आणि पत्नी मंदाकिनी हुले यांनी सांगितले.
महावितरण कंपनीने शेतीपंपासाठी जे वेळापत्रक दिले आहे. ते वरिष्ठ कार्यालयात तयार होते, सद्यस्थितीत रात्रीच्या वेळी शेती पंपाला वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केला आहे आणि त्यामध्ये वीजपुरवठा रात्री उशिरा देऊन सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
– शांताराम बांगर, कार्यकारी अभियंता, महावितरण मंचर.





