Yogesh Kadam : राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा; मंत्री योगेश कदमांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले “पुढील काही दिवसात..”
Yogesh Kadam : राज्यभरात सिलेंडरचा तुडवटा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Yogesh Kadam : इराण-इस्रायल संघर्षाची झळ आता भारताला बसण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम एलपीजी पुरवठ्यावर दिसू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट तसेच फूड इंडस्ट्रीसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील २० टक्के हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे.
अशातच या परिस्थितीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam )यांनी महत्वाची माहिती दिली आहे. हॉटेल बंद झालीत, अशी उदाहरणं आमच्यासमोर आली नाहीत. कमर्शिअल वापरासंदर्भात केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरगुती वापरासंदर्भात काही अडचणी नाहीत, अशी महत्वाची माहिती योगेश कदम यांनी दिली.
स्टोअरेज असतं तर सुविधा असतात. तुटवडा पुढील काही दिवसात नसेल, कारण जो गल्फमधील गॅसचा साठा आहे, तो पुरवठा आपल्याला झालाय. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारनं जे आदेश दिलेत, त्याचे पालन आम्ही करत आहोत. युद्धजन्य परिस्थिती झाली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेऊन आहेत. उपाययोजना आणि इतर गोष्टींबद्दल ते निर्णय घेतील.
एस्मा कायदा लागू (Yogesh Kadam)
हवाई हल्ल्यात आता आखाती देशांमधील तेल डेपोंवर लक्ष करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे काही देशांनी आपले तेल प्रकल्प बंद केले. परिणामी ऊर्जेचा पुरवठा आणि मागणी बाधित झाली आहे. या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या LNG पुरवठ्यात व्यत्यय आल्याने केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोलियम उत्पादनांची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने आजपासून संपूर्ण देशात ‘एस्मा’ म्हणजेच ‘अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा’ लागू केला आहे. त्यानुसार घरगुती PNG, वाहतुकीसाठी CNG आणि LPG उत्पादनाला प्राधान्याने गॅस पुरवठा केला जाईल, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
बुकिंगचा कालावधी वाढवला (Yogesh Kadam)
दुसरीकडे, पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी सिलेंडर बुकिंगचा कालावधी १५ दिवसांवरून २१ दिवस केला होता. आता तो वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. याचा अर्थ दोन सिलेंडर बुकिंगच्या दरम्यान किमान २४ दिवसांचे अंतर ठेवणे नव्या नियमानुसार गरजेचे असणार आहे.





