अविश्वास ठरावानंतर गोळीबार प्रकरण : केशव अरगडे यांना जामीन

पुणे – खेड पंचायत समितीचे सभापती भगावान पोखरकर यांच्यावर त्यांच्याच शिवसेनेच्या सदस्यांसह इतर पक्षांच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याचा रागातून अज्ञातवासत असलेल्या सदस्यांना गाठत गोळीबार केल्याप्रकरणात केशव अगरडे यांना जामीन मंजुर झाला आहे. जखमींची प्रकृती चांगली आहे. तपास पूर्ण झाला असून, गुन्ह्यातील जप्ती झाली आहे. आता त्यांच्याकडून जप्त करण्यासारखे काहीही राहिले नसल्याचा निष्कर्ष काढत सत्र न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी जामीन मंजुर केला.
केशव यांनी ऍड. सचिन ठोंबरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.राजकीय पूर्ववैमनस्यातून केशव यांना या गुन्ह्यात गुंतविण्यात आलेले आहे. एकाही साक्षीदाराने त्यांचे नाव घेतलेले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते दिसून येत नाहीत.
पहाटे पाच वाजता ही घटना घडली असून, तब्बल आठ तास विलंबाने एफआयआर नोंदविण्यात आलेली आहे. त्यामुले केशव यांना जामीन देण्याची मागणी ऍड. सचिन ठोंबरे यांनी केली. ही घटना खडकवासला परिसरातील एका हॉटेलमध्ये 27 मे रोजी पहाटे घडली. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात सभापती भगवान नारायण पोखरकर, जालिंदर नारायण पोखरकर, केशव आरगडे यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रसाद काळे यांनी फिर्याद दिली आहे.
शिवसेनेच्याच असलेल्या खेड पंचायत समिती सदस्या सुनिता संतोष सांडभोर यांच्यासह 11 सदस्यांनी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे दि. 24 मे रोजी सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. होता. त्यामुळे शिवसेनेचे सहा सदस्य, भाजपचा एक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार सदस्य खडकवासला गावच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलवर परिवारासह येऊन थांबले होते.
दरम्यान, भगवान पोखरकर सर्व सदस्यांचा पाठलाग करत होते. त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना घेऊन ते हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये असलेल्या रूमचे दरवाजे तोडून महिला पंचायत समिती सदस्य आणि त्यांच्या पतींना कोयते, गज व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्याबरोबरच गोळीबार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



