Shooting at Manhattan । अमेरिकेतील एका गर्दीच्या परिसरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे.एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमधील सेंट्रल मॅनहॅटनमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. या दरम्यान एका पोलिस अधिकाऱ्यालाही आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्लेखोराचाही या घटनेत मृत्यू झाला.हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, शेन तामुरा नावाचा २७ वर्षीय तरुण संध्याकाळी ६.३० वाजता ४४ मजली इमारतीत बंदूक घेऊन घुसला. इमारतीच्या आत पोहोचताच त्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःवरही गोळी झाडली. त्याचा जागीच मृत्यू झाला. शेन तामुरा हा लास वेगासचा रहिवासी आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराकडे पिस्तूल ठेवण्याचा परवानाही होता. न्यू यॉर्क अग्निशमन विभागाने सांगितले की, सोमवारी संध्याकाळी पार्क अव्हेन्यूवर असलेल्या या इमारतीतून एक फोन आला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की एखाद्याला गोळी लागली आहे. माहिती मिळताच, पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जबाबदारी स्वीकारली. चालू वर्षात अमेरिकेत २५४ गोळीबाराच्या घटना घडल्या Shooting at Manhattan । गन व्हायोलेन्स आर्काइव्हच्या आकडेवारीनुसार, मिडटाउन मॅनहॅटनच्या इमारतीत झालेली प्राणघातक गोळीबार ही या वर्षी अमेरिकेतील २५४ वी गोळीबाराची घटना आहे, ज्यामध्ये सामान्य लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे. न्यू यॉर्क शहराच्या महापौरांनी ‘हे’ आवाहन केले Shooting at Manhattan । न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले की, “न्यू यॉर्कवासीयांनो, मिडटाउनमधील सक्रिय गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबाबत चौकशी सुरू आहे. कृपया काळजी घ्या आणि जर तुम्ही या परिसरात असाल तर बाहेर पडू नका.” मात्र हल्लेखोराचा आता मृत्यू झाला आहे. पोलिस गुन्ह्याच्या ठिकाणाची चौकशी करत आहेत आणि आता सर्व काही नियंत्रणात आहे.