शोले@50 : भन्नाट किस्से, जबरदस्त डायलॉग.! ‘या’ खास गोष्टीमुळे शोले झाला सुपरहिट
Sholay@50 | Sholay Movie : 15 ऑगस्ट 1975 साली शोले प्रदर्शित झाला आज त्या गोष्टीला 50 वर्ष पुर्ण झाली. परंतु आजही शोले चित्रपटाची लोकप्रियता आणि जादू तसुभरही ओसरलेली नाही. भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वकालिक उत्कृष्ट चित्रपटापैकी एक म्हणजे शोले… सुरवातीला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता आणि फ्लॉप असा शिक्का बसला परंतु जस जसे प्रेक्षक सिनेमा पाहत गेले आणि प्रेक्षक भारावून गेले आणि निव्वळ मुख प्रसिद्धी च्या जोरावर सिनेमा तुफान चालला आणि एक इतिहास घडला. उत्पनाचे सर्व विक्रम मोडीत काढून शोले उच्च शिखरावर विराजमान झाला आणि हा विक्रम आजतगायत अबाधित आहे जर 50 वर्षा पूर्वीचा काळ लक्षात घेतला तर. आज शोले एक आख्यायिका बनला आहे.
बॉलीवूड चा हॉलिवूड च्या तोडीचा टक्कर देणारा चित्रपट म्हणजे शोले..जी. पी. सिप्पी यांची निर्मिती, रमेश सिप्पी यांचे सफाईदार दिग्दर्शन, सलीम-जावेद या जोडगोळीचे दमदार संवाद आणि खिळवून ठेवणारे वेगवान कथानक आणि पटकथा, आर डी चे संगीत, अँग्री यंग मॅन म्हणून नुकताच नावारूपाला आलेला अमिताभ, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची सदाबहार जोडी, जया भादुरी आणि संजीव कुमार यांचा सशक्त अभिनय व आपल्या पहिल्याच प्रयत्नात अजरामर खलनायक उभा करणारा अमजद खान या सगळ्यांनी मिळून शोले या चित्रपटाला वेगळ्याच उंची वर नेऊन ठेवले आहे जिथे अजूनही कोणी पोहचू शकलेले नाही. शोले चित्रपटाचे नेत्रदीपक यश हे कोणा एकट्याचे नाही तर टीम वर्क चा उत्कृष्ट दाखला म्हणजे शोले.
शोले मधील प्रत्येक व्यक्तीरेखेने लोकांच्या मनात घर केले आहे आणि प्रत्येक व्यक्तीरेखा कायम स्वरूपी लक्षात राहते. संजीव कुमारचा ठाकूर बलदेव सिंग, जय -वीरू ची अफलातून केमिस्ट्री आणि एकमेकांसाठी जीव देणारी दोस्ती, हेमा मालिनीची अवखळ बसंती, धीर गंभीर श्वेत वस्त्रा मधील जया, जगदीप चा सुरमा भोपाली, अंग्रेजो के जमाने के जेलर असरानी, सत्येन कप्पू चा रामलाल, इतना सन्नाटा क्यूँ हैं भाई म्हणणारे ए. के. हंगल, सचिन चा अहमद, केस्टो मुखर्जी चा न्हावी, मॅक मोहन चा सांभा, विजू खोटे चा कालिया, लीला मिश्रा ची मौसी आणि अमजद खान चा हा पहिलाच सिनेमा आणि त्याने जबरदस्त साकारलेला गब्बर सिंग….. लाजवाब कास्टिंग चा अनुभव म्हणजे शोले.
शोले कायमस्वरूपी लक्षात राहतो त्याच्या दमदार संवादांसाठी… आजही लोकांच्या मनात त्याचे संवाद गारुड करत आहेत. अरे ओ सांभा कितने आदमी थे, सरदार मैंने आपका नमक खाया हैं अब गोली खा, ये हाथ मुझे दे दे ठाकूर इन कुत्तो के सामने मत नाचना बसंती हे आणि असे अनेक संवाद आज ही प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच चित्रपटातील अनेक प्रसंग आजही लोकांना पुन्हा पुन्हा शोले बघण्यासाठी भाग पाडतात.
हॉलिवूड पद्धतीने प्रथमच चित्रित केलेले सुरवातीचे ट्रेन वरील घोड्यावर पाठलाग करतानाचे दृश्य, होळी च्या प्रसंगी दरोडे खोरांसोबत झालेली चकमक, रेल्वे रुळा वर जमलेल्या लाकडांना मारलेली रेल्वे ची धडक, (आपण त्या काळचा हॉलिवूड पट पाहत आहोत याची पदोपदी जाणीव होते) जय चे मौसी सोबत वीरू बद्दल संभाषण, वीरू चे पाण्या च्या टाकीवरील आंदोलन (आज ही अनेक जण असे आंदोलन करतात ) संध्याकाळी वर गच्चीवर उभी असणारी खिन्न अवस्थेतील जया आणि माऊथ ऑर्गन वाजवणारा अमिताभ, सगळा परिवार मृत्यूमुखी पडलेला पाहून घोड्यावर निघालेला संजीव कुमार, गब्बर च्या अड्डयावरील त्याचा निर्भीड वावर, नाण्याच्या दोन्ही बाजू एक सारख्या आहेत ते पाहून उद्विग्न होणारा वीरू असे अनेक प्रसंग लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आणि आजही तेवढेच लोकं वारंवार बघतात.
आर. डी चे गिटारिस्ट भानूदा यांनी गिटार वर अप्रतिम वाजवलेले टायटल सॉंग आणि माऊथ ऑर्गन वरील संगीत आजही तितकीच श्रवणीय आहे. प्रत्येक होळीला न चुकता शोले चे गाणे हमखास लागते. जय आणि वीरूच्या अविस्मरणीय मैत्रीचे आजही दाखले दिले जातात. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं आणि त्याचे चित्रीकरण, त्यांचे नाणे उडवून टॉस करणे आणि इतर बरेच प्रसंग आवर्जून पाहिले जातात.
1975 ते 1980 पर्यंत तब्बल पाच वर्षे सलग शोले मुंबईतील मिनर्व्हा थिएटर मध्ये चालला हा पण एकप्रकारे विक्रम झाला. उत्पनाचे सगळे विक्रम मोडणारा चित्रपट म्हणून शोले आजही अग्रस्थानी आहे. व्यावसायिक उत्पन्नाची सगळी समीकरणे या चित्रपटानी बदलून टाकली. 70 एम.एम मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट म्हणजे शोले. बॉलिवूड ला नवी दिशा दाखवणारा शोले आज 50 वर्षे होऊन सुद्धा आपली लोकप्रियता टिकवून आहे.
आयफा चा 25 वा पुरस्कार सोहळा नुकताच जयपूर ला पार पाडला. त्यावेळेस शोले च्या 50 व्या वर्ष पूर्ती प्रित्यर्थ खास स्क्रीनिंग जयपूर च्या राजमंदिर या अतिभव्य सिंगल स्क्रिन सिनेमा गृहात सिनेमातील कलाकारांसोबत पार पडले आणि लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. 50 वर्षे होऊन सुद्धा शोले ची जादू आजही कायम आहे आणि येणारी वर्षे सुद्धा कायम राहील यात शंका नाही.रमेश सिप्पी यांच्या या अजरामर कलाकृतीला मानाचा मुजरा…
– राहुल सराफ (नागपूर)





