Bhandara News : धक्कादायक ! भंडाऱ्यात भूमिगत मँगेनीज खाणीचा बोगदा खचला; 2 जणांचा मृत्यू

भंडारा : जिल्ह्यातल्या चिखला भूमिगत मँगेनीज खाणीचा बोगदा खचून दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. प्रशासनाकडून तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेत जखमीची विचारपूस केली आहे. चिखला मोइल वर्टीकल दोन अंडरग्राउंड लेव्हल 3 मध्ये 100 मीटर खोली असलेल्या ठिकाणी पहिल्या शिफ्टचे कामगार काम करत होते.
साधारणतः आज सकाळी 09.00ते 09.30 दरम्यान स्लॅब कोसळला. या ढिगार्याखाली तीन कामगार दबले. त्यातील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. विजय नंदलाल (वय 50, रा. खरपडी तिरोडी), अरुण जीवनलाल चोरमार (वय 41, रा. सीतासांगवी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर शंकर सहदेव विश्वकर्मा जखमी आहेत.
दरम्यान, या घटनेत आणखी काही कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे. या पूर्ण घटनेची शासनस्तरावर चौकशी करावी. घटनेतील अपघातग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देत कायम स्वरुपी नोकरी द्यावी, अशी मागणी शरचचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी केली आहे.





