धक्कादायक ! कामाच्या अतिरिक्त तणावातून इंजिनिअरने संपविले आयुष्य

चेन्नई – पुण्यात कामाच्या अतिरिक्त तणावातून अॅना सबॅस्टियन या 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. असाच एक धक्कादायक प्रकार चेन्नईमध्येही घडला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
कार्तिकेयन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ज्यावेळी कार्तिकेयन हे टोकाचे पाऊल उचलले त्यावेळी घरात कुणीही नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकेयन यांनी स्वत:ला इलेक्ट्रिक शॉक देऊन संपवले.
कार्तिकेयन यांच्या पत्नी जयाराणी घरी आल्या तेव्हा ही सर्व घटना समोर आली. कार्तिकेयन हा पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलासोबत चेन्नईमध्ये राहत होता. कार्तिकेयन मागील 15 वर्षांपासून एका सॉफ्टवेअर कंपनी टेक्निशियन म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो नवीन कंपनीत रुजू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी जयाराणी या थिरुनल्लूर मंदिरात गेल्या होत्या. मुलाला त्यांनी आईच्या घरी सोडले होते. जयाराणी घरी परतल्या त्यावेळी दरवाजा बराच वेळ वाजवून देखील कुणीच उघडला नाही.
त्यावेळी त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. मात्र दरवाजा उघडल्यानंतर जे चित्र त्यांना दिसले ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कार्तिकेयनचा मृतदेह विद्युत तारेला चिकटलेला आढळून आला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवले.





