sangli news – सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात बारावीच्या खासगी शिकवणीच्या सराव परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक असलेल्या जन्मदात्या बापाने लेकीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीत शिकणा-या साधनाला नीट परीक्षेत कमी गुण का मिळाले? असे विचारात माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याध्यपक असलेल्या धोंडीराम भोसलेने मुलीला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२० जून) घडली. याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी (२२ जून) वडील धोंडीराम भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, साधना ही अभ्यासात हुशार असून तिला दहावीला ९२.६०टक्के गुण मिळाले होते. शाळेमध्ये तिचा पहिला क्रमांक आला होता. बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तिने तयारी सुरू होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यासाठी खासगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे रागात असलेल्या वडील धोंडीरामने घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. गंभीर जखमी झालेल्या साधनाला उपचारासाठी दवाख्यान्यात घेऊन गेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर अपराधी पित्याने आपले कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला होता. पण शवविच्छेदन अहवालातून प्रकार समोर आला आहे. धोंडीराम भोसले यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.