Pune District : आळंदीतील धक्कादायक प्रकाराने विवाह संस्थांच्या पडताळणीवर प्रश्नचिन्ह
Pune District : आळंदीमध्ये दररोज राज्याच्या विविध भागांतून आलेल्या जोडप्यांचे प्रेमविवाह, कोर्ट मॅरेज आणि नोंदणीकृत विवाह मोठ्या प्रमाणावर होतात.

आळंदी : राज्यभरातून प्रेमविवाह, कोर्ट मॅरेज आणि तात्काळ विवाहासाठी पसंतीचे ठिकाण ठरलेल्या आळंदीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील एका तरुण-तरुणीचा विवाह आळंदीतील एका खासगी विवाह संस्थेमार्फत लावून देण्यात आला; मात्र विवाहानंतर दोघेही एकाच भावकीतील असून नात्याने भाऊ-बहिण लागतात, अशी माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आहे; मात्र संबंधित तरुण आणि तरुणी यांनी विवाह कायम ठेवण्याची भूमिका घेतल्याचे समजते. या घटनेमुळे सामाजिक, कायदेशीर आणि नैतिक अशा अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. आळंदीमध्ये दररोज राज्याच्या विविध भागांतून आलेल्या जोडप्यांचे प्रेमविवाह, कोर्ट मॅरेज आणि नोंदणीकृत विवाह मोठ्या प्रमाणावर होतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक खासगी विवाह संस्था कमी वेळात आणि कमी खर्चात विवाह लावून देण्याच्या जाहिराती करत असल्याने घरच्यांच्या विरोधात विवाह करू इच्छिणार्या जोडप्यांची आळंदीला मोठी पसंती असते. काही विवाह संस्थांकडून अवघ्या काही तासांत आणि सुमारे 15 हजार रुपयांच्या खर्चात विवाह लावून दिला जात असल्याची माहितीही समोर आली आहे. अशा परिस्थितीत विवाहापूर्वी वधू-वरांचे नातेसंबंध, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आवश्यक कागदपत्रांची पुरेशी पडताळणी केली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या विवाहासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आणि राहत्या पत्त्याचा पुरावा यांसारख्या कागदपत्रांच्या आधारे प्रक्रिया पूर्ण केली जाते. विवाहानंतर संबंधित जोडप्याला तातडीने विवाह प्रमाणपत्रही देण्यात येते. आळंदीत सुमारे 150 विवाह कार्यालये आणि 500 हून अधिक धर्मशाळा कार्यरत असल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर अशा विवाह संस्थांसाठी अधिक कठोर पडताळणी प्रक्रिया, नातेसंबंधांची खातरजमा आणि नियामक नियंत्रण बंधनकारक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत अहवालानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.





