धक्कादायक ! चंडीपुरा विषाणूमुळे गुजरातमध्ये पहिला मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमध्ये आतापर्यंत झालेल्या आठ मृत्यूंपैकी एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू चांदीपुरा संसर्गामुळे झाला असल्याची पुष्टी राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेने अर्थात एनआयव्हीने केली आहे. त्यामुळे राज्यात अशा प्रकारचा पहिला मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. गुजरातमध्ये आतापर्यंत १४ संशयित चांदीपुरा विषाणू संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे सर्व नमुने पुष्टीकरणासाठी पुणेस्थित एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले.
साबरकांठा जिल्ह्यातील हिमतनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मरण पावलेल्या अरवलीच्या मोटा कंथारिया गावातील चार वर्षांच्या मुलीच्या नमुन्यात चांदीपुरा विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विषाणूच्या संसर्गामुळे राज्यातील हा पहिला मृत्यू आहे, असे साबरकांठा मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी राज सुतारिया यांनी सांगितले.
साबरकांठा जिल्ह्यातील इतर तिघांचे नमुने जे एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते ते संसर्गासाठी निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण बरे झाले आहेत, असे ते म्हणाले. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित भागातील २६ निवासी झोनमध्ये ४४,००० हून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.





