नागपूर : भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण असताना नागपूरच्या ४३ वर्षीय महिलने नियंत्रण रेषा (LOC) अवैधरित्या ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुनीता असे या महिलेचे नाव असून, त्या पाकिस्तानातील एका पाद्रीला भेटण्यासाठी ही जोखमीची कृती केल्याचे उघड झाले आहे. सध्या त्या पाकिस्तानी यंत्रणांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता या १४ मे रोजी लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील हुंदरमान या LOCलगतच्या शेवटच्या गावातून सीमा सुरक्षा दलाची नजर चुकवून पाकिस्तानात गेल्या. सुनीता यांनी आपल्या १५ वर्षीय मुलाला गावात थांबण्यास सांगितले होते. त्या परत न आल्याने गावकऱ्यांनी मुलाची विचारपूस केली आणि हा प्रकार उघड झाला. गावकऱ्यांनी मुलाला लडाख पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या सुनीता पाकिस्तानी यंत्रणांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. यापूर्वीही दोनदा प्रयत्न – सुनीता या उत्तर नागपूरमधील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होत्या. गेल्या दहा वर्षांपासून त्या पतीपासून विभक्त असून, मुलासह माहेरी राहतात. त्यांच्यावर नागपूरच्या प्रादेशिक मानसिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली आहे. सुनीता यांनी यापूर्वी अमृतसरजवळील अट्टारी सीमेवरून दोनदा पाकिस्तानात अवैध प्रवेशाचा प्रयत्न केला होता, परंतु सीमा सुरक्षा दलाने (BSF) तो हाणून पाडला होता. पाद्रीला भेटण्यासाठी धाडस – तपासातून समोर आले आहे की, सुनीता या ऑनलाइन ओळख झालेल्या पाकिस्तानी पाद्रीला भेटण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होत्या. याच उद्देशाने त्यांनी कारगिलमधील अत्यंत संवेदनशील आणि कडक सुरक्षाव्यवस्थेच्या LOC क्षेत्रात प्रवेश केला. त्या कशा प्रकारे सीमा ओलांडू शकल्या, याबाबत सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्था तपास करत आहेत. सुनीताच्या फोन रेकॉर्ड्स आणि ऑनलाइन संभाषणांचीही छाननी सुरू आहे. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह – या घटनेने LOCवरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागपूर पोलिसांनी कारगिल पोलिसांशी संपर्क साधून सुनीताच्या पार्श्वभूमी आणि प्रवासाबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सुनीताच्या मुलाला सध्या लडाख पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले असून, त्याच्या कुटुंबीयांना कर्गिल येथे बोलावण्यात येत आहे.