शिरूरमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; प्रितम-प्रकाश नगरमधील नागरिकाच्या खात्यातून 1 लाख रुपये लंपास

शिरूर : शिरूर शहरातील प्रितम-प्रकाश नगर येथील एका रहिवाशाच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर चोरट्यांनी ऑनलाईन फसवणूक करत १ लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, सायबर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रितम-प्रकाश नगर येथील किशोर सावळेराम कवडे (वय ३९, व्यवसाय-नोकरी) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कवडे यांच्या एचडीएफसी बँक, शिरूर शाखेतील खात्यातून दोन ऑनलाईन व्यवहारांद्वारे प्रत्येकी ५०,००० रुपये, असे एकूण १ लाख रुपये काढले गेले. विशेष म्हणजे, या व्यवहारांसाठी कवडे यांना कोणताही ओटीपी किंवा पुष्टीसंदेश प्राप्त झाला नाही. त्यांनी कोणालाही बँकेची माहिती दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सायबर चोरट्यांनी अत्यंत हुशारीने फसवणूक केल्याचे दिसते. बँक ग्राहकाची कोणतीही सक्रिय भूमिका नसताना रक्कम काढली गेल्याने बँकिंग प्रणालीतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिरूर पोलिसांनी आयटी अॅक्ट व भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांना आवाहन: बँक माहिती, ओटीपी, पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा, असे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.





