Jalgaon News : खळबळजनक ! जळगावमध्ये चक्क पोलिसाचेच अपहरण; 4 तासांनी झाली सुटका

जळगाव : सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्याच सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचा-याचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस विभाग अलर्ट मोडवर असून या कर्मचा-याच्या सुटकेसाठी जळगाव तसेच मध्य प्रदेशातील पोलिस कर्मचारी रवाना करण्यात आले होते.
अखेर, 4 तासांच्या थरारानंतर पोलिस कर्मचा-याला सुखरुप परत आणण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र, या घटनेने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर दोन उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले असता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काहीजण पोलिसांवर धावून गेले.
त्यानंतर, एका पोलिस कर्मचा-याला ताब्यात घेऊन त्यांनी सीमेपलीकडे असलेल्या मध्य प्रदेशातील उमर्टी गावात नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्यासह पोलिस अधिका-यांचा ताफा उमर्टी गावाकडे रवाना झाला. चार तासांच्या थरारानंतर अपहरण झालेल्या पोलिस कर्मचा-याची सुटका करण्यास पोलिसांना यश मिळाले.





