धक्कादायक ! 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत हत्या; ठाण्यातील दुर्दैवी घटना

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी-कल्याण सीमेवरील गांधारी पुलाजवळच्या बापगाव या गावातील कब्रस्तान परिसरातील निर्जन स्थळी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा निर्दयीपणे हत्या देखील करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक 13 वर्षांची अल्पवयीन शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळी चार पासून बेपत्ता असल्याने तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी मुलीचा शोध घेणे सुरू केले असता मंगळवारी सकाळी मुलीचा मृतदेह बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जनस्थळी आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली.
या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचेही दिसून आले. मुलीवर अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी अधिक गांभीर्याने तपास सुरू केला आहे.
मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, खाऊ खाण्यासाठी मुलीने आईकडून पैसे घेऊन जवळील दुकानात गेली होती. मात्र, तेव्हापासून ती बेपत्ता होती. तिचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला. परंतु, रात्रीपर्यंत तिचा कुठेच काही पत्ता लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मंगळवारी सकाळी पडघा पोलिसांना कल्याण भिवंडी सीमेवरील बापगावच्या हद्दीत मुलीचा मृतदेह सापडला.





