धक्कादायक ! उत्तराखंडमधील कारागृहात एका महिलेसह 44 कैदी HIV पॉझिटिव्ह; प्रशासन हादरले

नवी दिल्ली : उत्तराखंडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील हल्दवानी तुरुंगात एका महिलेसह ४४ हून अधिक कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कैदी एचआयव्ही बाधित झाल्याने कारागृह प्रशासनाला एकच गोंधळ उडाला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कैद्यांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, महिन्यातून दोनदा रुग्णालयातील एक पथक नियमित तपासणीसाठी कारागृहात येते. ज्या कैद्यांना किरकोळ समस्या आहेत त्यांना जागेवरच औषध दिले जाते. अधिक गंभीर समस्या असलेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार केले जातात.
एचआयव्हीबाधित कैद्यांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी कारागृह प्रशासन नियमित तपासणीही करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर एचआयव्ही रुग्णांसाठी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, डॉक्टर नियमितपणे कैद्यांची तपासणी करतात. एखादा कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर मोफत उपचार केले जातात. डॉक्टरांच्या मते, एचआयव्हीची अनेक कारणांमुळे लागण होवू शकते. या प्रकारा बाबत जेल अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिक्रिया आली नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर तुरुंग प्रशासन हादरले आहे.





