पंढरपूर : पंढरपूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवासेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर आणि माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले आणि शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी मार्गदर्शन केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये काशी कापडी समाजाचे पंढरपूर अध्यक्ष औदुंबर गंगेकर, समाजसेवक गणेश भिंगारे, तुळशी माळा कारागीर कामगार संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय वाडेकर, सहसचिव विनायक पिंगळे, सदस्य सागर उपळकर, दिनेश लोंकलकर, रवींद्र टमटम, गौरव वाडेकर, पांडुरंग भिंगारे, तसेच युवासेना उपशहरप्रमुख विशाल डोंगरे, शहर सचिव प्रथम भिंगारे, विभागप्रमुख हेमंत इंदापूरकर, सोशल मीडिया प्रमुख सोमनाथ शिंदे आणि शाखा प्रमुख प्रथमेश उपळकर यांचा समावेश आहे. यावेळी श्रीनिवास उपळकर यांनी वारकरी संप्रदायात महत्त्वाच्या तुळशीमाळा बनवण्याच्या यंत्राची प्रतिकृती उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेट देत काशी कापडी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विनंती केली. शिंदे यांनी सर्वांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, “सर्वसामान्यांचे प्रश्न केंद्रबिंदू ठेवून काम करा. तळागाळातील जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्या आणि पक्षसंघटन मजबूत करा.” उपळकर यांना शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना पंढरपूर शहर समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रवेश ठाकरे गटासाठी धक्का मानला जात असून, पंढरपूरातील शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.