Pandharpur-Ghuman Cycle pilgrimage : पंढरपूर ते घुमान पंजाब 2,500 किमी सायकलवारी; 20 ते 80 वर्षांपर्यंतचे सायकलपटू सहभागी होणार
Pandharpur-Ghuman Cycle pilgrimage : पंढरपूर ते घुमान पंजाब सायकलवारीला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 2,500 किमीच्या या यात्रेत 20 ते 80 वर्षांपर्यंतचे सायकलपटू सहभागी होणार आहेत.

Pandharpur-Ghuman Cycle pilgrimage : संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान (पंजाब) या सुमारे अडीच हजार किलोमीटरच्या आध्यात्मिक सायकलवारीला 21 नोव्हेंबरपासून पंढरपूर येथून सुरुवात होणार आहे. ही सायकलवारी 13 डिसेंबरला घुमान येथे पोहोचणार आहे. यंदाचे सायकलवारीचे हे पाचवे वर्ष आहे.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि नामदेव दरबार कमिटी, घुमान पंजाब यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकलवारीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या राज्यांतून सायकलवारीचा प्रवास होणार आहे.
या यात्रेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलपटू सहभागी होणार असून 20 वर्षांच्या तरुणांपासून 80 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील सायकलस्वारांचा सहभाग हे या सायकलवारीचे वैशिष्ट्य आहे. सुमारे 125 सायकलपटू या उपक्रमात सहभागी होतात. विशेष म्हणजे सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.
मागील चार वर्षांपासून या सायकलवारीच्या माध्यमातून संत विचारांचा प्रचार-प्रसार केला जात आहे. तसेच शांती, समता, बंधुता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतानाच ‘नदी प्रदूषण हटाव, नदी बचाव’ हा संदेशही जनतेपर्यंत पोहोचविला जात आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही हा उपक्रम राबविला जात आहे.
यंदाची यात्रा संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती, संत ज्ञानेश्वर माऊलींचा 729 वा संजीवन समाधी सोहळा आणि गुरू नानक जयंती या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सायकलवारीचा मार्ग
प्रारंभ : पंढरपूर
एकूण अंतर : सुमारे 2,500 किलोमीटर
राज्ये : महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब
प्रमुख तीर्थस्थळे : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, सासवड येथील संत सोपानकाका समाधी मंदिर, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर व ज्योतिर्लिंग मंदिर, बडोदा येथील इस्कॉन मंदिर, शामलाजी मंदिर, ऋषभदेव येथील जैन मंदिरे, देवमाली येथील श्री देवनारायण मंदिर, पुष्कर तीर्थक्षेत्र आणि घुमान येथील संत नामदेव महाराज मंदिर व गुरुद्वारा.
प्रमुख शहरे : पुणे, नाशिक, सुरत, बडोदा, अहमदाबाद, उदयपूर, चित्तोडगढ, पुष्कर, हिसार आणि बियास.
नोंदणी : सायकलवारीत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
संपर्क : 9822023564, 8788477057





