अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मोठा झटका; मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने CBIचा मार्ग मोकळा

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्याविरोधात सीबीआयतर्फे दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने आज फेटाळली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
तत्पूर्वी, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द ठरवण्यात यावा अशी मागणी देशमुखांनी याचिकेद्वारे केली होती. मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
राज्य सरकारची याचिकाहीफेटाळल्याने सीबीआयचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र सरकारने अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयतर्फे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या, तसेच सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेत तो भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती.
न्यायालयाने आज देशमुख यांच्या याचिकेसोबतच राज्य सरकारची विनंतीही फेटाळल्यामुळे राज्य सरकारसाठी देखील हा धक्का ठरला आहे. तसेच न्यायालयाच्या निकालामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा सीबीआयचा मार्ग मोकळा झाला आहे.





