शिक्रापूर, (वार्ताहर) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि शिरूर तालुक्यात मनसे स्टाइलने अनेक आंदोलने करुन चर्चेत आलेले सुशांत किशोर कुटे यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत हाती तुतारी घेतल्याने मनसेला धक्का बसला आहे. शिरूर तालुक्यात सुशांत कुटे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काम करत मनसे स्टाइलने अनेक आंदोलने केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांकडून सुशांत कुटे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली होती. सुशांत कुटे यांनी यापूर्वी शिरुर तालुक्यात मनसे स्टाईलने आंदोलन केल्याने त्यांना जेलची हवा खावी लागली असताना थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुशांत यांना फोन करुन आधार देत आंदोलनाचे कौतुक केले होते. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाचा राजीनामा दिलेला असताना नुकतेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुशांत कुटे यांसह वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय भालेराव, नईम इनामदार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे व खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यावेळी आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, बाळासाहेब नरके, ज्ञानेश्वर थेऊरकर यांसह आदींच्या उपस्थितीत प्रवेश केला. तर यावेळी बोलताना शरदचंद्र पवार यांच्या विचारला प्रेरित होऊन आणि आमदार अशोक पवार यांच्या कार्याचा अभ्यास करुन आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला असल्याचे सुशांत कुटे यांनी सांगितले.