शिक्रापुरात खळबळ! वॉशिंग सेंटरजवळ आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह ; ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान.

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – येथे शौर्य वाशिंग सेंटर शेजारील जागेत अंदाजे ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.यश पवार हे शौर्य वाशिंग सेंटर येथे काम करत असताना, त्यांना शेजारील जागेत एक व्यक्ती बराच वेळ झोपलेला दिसला. त्याला उठवण्यासाठी जवळ गेले असता, त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याचे त्यांना जाणवले. याबाबत त्यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, ५० वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृताचे वर्णन काळे केस, पांढरी दाढी, अंगाने सडपातळ, अंगात मळकट शर्ट व जर्किन, खाली हाफ पँट असे आहे. यश दिनकर पवार यांनी याबाबत शिक्रापूर पोलिसात खबर दिली असून, पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे करत आहेत.





