खटाव, (प्रतिनिधी) – नेमबाजी स्पर्धेत यशाला गवसणी घालणारा खटावचा सुपूत्र, लीलावतीबाई पोतदार हायस्कूलचा विद्यार्थी श्लोक सतीश हजारे याने रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे त्याने एसजीएफआय शूटिंग स्पर्धेसाठी आपले स्थान कायम केले आहे. बंगळुरू येथील पदुकोण-द्रविड स्पोर्ट्स अकादमीत पार पडलेल्या सी. आय. एस. सी. ई. नॅशनल शूटिंग स्पर्धेमध्ये १० मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात १७ वर्षांखालील वयोगटामध्ये 600 पैकी 594 गुण प्राप्त करत सुवर्ण पदक पटकावले. त्याने स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये स्वतःचे स्थान निश्चित केले आहे. श्लोक हजारे हा प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज मध्ये प्रशिक्षक श्रीमती स्नेहल पापळकर कदम यांच्याकडे नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे.तसेच क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू आणि संस्थेचे सचिव डॉ. मोहन राणे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. श्लोक हजारे हा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता आहे. अथक परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शना नुसार भविष्यातील वाटचाल करणार आहे. तसेच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे श्लोक हजारे याने सांगितले. या यशाबद्दल श्लोक हजारे याचे आ. महेश शिंदे, जि.प माजी उपाध्यक्ष प्रदिप विधाते, माजी जि. प सदस्य अशोक कुदळे, माजी पं स सदस्य मधुकर पाटोळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहूल पाटील, माजी सरपंच नंदकुमार वायदंडे, पत्रकार संजय देशमुख,किरण देशमुख व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.