अकोल्यात भीषण दुर्घटना; प्रवाशांनी भरलेल्या शिवशाही बसने घेतला पेट

अकोला : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे तर दुसरीकडे अकोल्यात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. यामध्ये प्रवाशांनी भरलेल्या शिवशाही बसला अचानक आग लागली आहे. शेगाववरुन अकोल्याला निघालेल्या शिवशाही बसमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
महामार्ग क्रमांक सहावर तुषार हॉटेलजवळ शिवशाही भीषणने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती कि या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. ही दुर्घटना घडली तेव्हा बसमध्ये एकूण 44 प्रवासी प्रवास करत होते. मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आला. त्याने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. तातडीनं सर्व प्रवाशांना बाहेर काढलं. पाहता पाहता बसमध्ये आग लागली आहे. आगीनं रौद्र रुप काही क्षणात धारण केलं आणि संपूर्ण बस जळून खाक झाली.
अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर मधील सिलेंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनीही मदत केली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. यादरम्यान अग्निशामन दलाच्या गाडयांना पाचारण करण्यात आले त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र तोपर्यंत ही संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली होती. ही शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.





