किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण: सुषमा अंधारेंच्या प्रतिक्रियेने उंचावल्या अनेकांच्या भुवया…

पुणे – सोमवारी (दि. 17) सायंकाळी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समाज माध्यमांसमोर आला. त्यानंतर काल रात्रीपासून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. विविध पक्षांचे राजकीय नेते मंडळी सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणावर प्रतिक्रिया देत आहेत. राज्यात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद पडले. विरोधी पक्षातील नेतेमंडळींनी हा मुद्दा उचलून धरला आणि याबाबत सखोल चौकशीची मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर किरीट सोमय्या यांनीदेखील एका पत्रकाद्वारे ‘मी कोणावरही अत्याचार केला नसल्याचे म्हणत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षातील नेतेमंडळींवर भ्रष्टाचाराचे विविध आरोप केले होते. त्यामुळे जनतेमध्ये सोमय्या यांच्याबाबत विरोधी पक्ष तसेच त्यांचे पदाधिकारी यांच्यामध्ये रोष होता. किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी विरोधी पक्षांकडून सोमय्या यांचा निषेध करण्यात येत आहे. काही ठिकाणी सोमय्या यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला.
किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या की, अधिवेशनाच्या काळात भाजप नेते किरीट सोमय्यांचा व्हिडीओ बाहेर काढण्यात भाजपचाच हात आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले. त्यांचे घोटाळे बाहेर काढले, ते सगळे नेते आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे सगळ्यांना चांगलं ठरवण्यासाठी भाजपने किरीट सोमय्यांचा व्हिडीओ बाहेर काढून तो व्हायरल केला असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. त्यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
अंधारे म्हणाल्या की, चर्चा करावी असा हा व्हिडीओ नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल ते काय बोलले? त्यांनी काय केलं याचा परिणाम होत असतो. आता अनेकांचे वस्त्रहरण करणाऱ्याचं वस्त्रहरण केलं आहे. किरीट सोमय्यांकडून 40 महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. ईडी, सीबीआय चौकशी लावण्याच्या धमकी देत अधिकाऱ्यांच्या घरातील महिलांचं शोषण करण्यात आलं आहे. 30-35 व्हिडीओ आहेत. किमान तीन साडे तीन तासाचे व्हिडीओ आहे. भाजप पद देतो, घटस्फोट करून देतो, अस सांगून फसवणूक केली आहे. त्यामुळे हे योग्य नाही. भाजपचे लोक काहीही करताना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.”
यासंपूर्ण प्रकरणात महिलांची गोपनीयता जपली पाहिजे. किरीट सोमय्यांनी जे काही केले ते वाईटच आहेत. मात्र भाजपने यापूर्वी अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवल्या आहेत. किरीट सोमय्यांची भाजपसाठीची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे त्यांचा व्हिडीओ आता अधिवेशनाच्या काळात बाहेर काढला आहे. गृहमंत्री त्यांच्यावर कारवाई करतील का असा प्रश्न आहे? असेही त्यांनी म्हंटले आहे.





