हिंगोली : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी भरसभेत केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण त्यांच्या या विधानाची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. हे नेमके काय प्रकरण आहे जाणून घेऊयात… शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आपल्या रोखठोक भूमिकेमुळे अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. असेच एक प्रकरण समोर आले त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी, त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करतो, त्यांना सांगा येण्या-जाण्याचा जे काही लागते ते आम्हाला सांगा. असे आर्थिक प्रलोभन देणार वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केले. ते हिंगोलीतील कळमनुरी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने घेतली दखल आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. त्यांच्या या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगाने आमदार संतोष बांगर यांना त्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच पुढील 24 तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा असं त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.