Shivneri Sugars: शिवनेरी शुगर्सला निसर्गाचा मोठा फटका; वादळी पावसात ७.५ कोटींचे नुकसान
Shivneri Sugars: डिसेंबरमधील आगीच्या दुर्घटनेनंतर शिवनेरी शुगर्सला निसर्गाचा दुसरा फटका; पंचनाम्यानंतर नुकसानीचा अंतिम आकडा स्पष्ट होणार.

Shivneri Sugars – जयपूर, ता. कोरेगाव येथे रविवारी (दि. 7) सायंकाळी वादळी पावसाने शिवनेरी शुगर्स या खाजगी कारखान्याच्या गोदामाचे छत उडून, 74 हजार क्विंटल साखर भिजली. यामध्ये कारखान्याचे सुमारे साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जयपूर परिसरात रविवारी (दि. 7) सायंकाळी वादळी वार्यासह मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. वादळी वार्याने शिवनेरी शुगर्स गोदामावरील छत उडून, पावसाचे पाणी गोदामात शिरले.
तेथे साठवून ठेवलेली 74 हजार क्विंटल साखर भिजून खराब झाली आहे. कारखान्याच्या अधिकार्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामा आणि तांत्रिक तपासणीनंतर नुकसानीचा अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हे नुकसान झाल्याचे कारखाना व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. मात्र, कारखान्यातील आगामी ऊस गाळप किंवा इतर कामकाजावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे गोदामाचे लिपिक नीलेश पवार यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहतूकदारांमध्ये काही काळ चिंता पसरली होती. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. नुकसान झालेल्या साखरेची प्रतवारी, साठवणूक आणि पुढील कार्यवाही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. भविष्यात नैसर्गिक आपत्तींचा फटका बसू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात येणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सात महिन्यांत दुसरी घटना
याच साखर कारखान्यात डिसेंबर 2025 मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून, भांडारामधील साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या सातव्या महिन्यात कारखान्याचे पुन्हा मोठे नुकसान झाले आहे.





