Satara: ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली ना. एकनाथ शिंदें यांची भेट
Satara जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवली असली, तरी अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप कायम आहे. या पदासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय गटांकडून चाचपणी सुरू असून, नेत्यांच्या हालचालींनाही वेग आला आहे.

Satara: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरुन जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी दरे (ता. महाबळेश्वर) येथे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट घेतली. या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीशी या भेटीचा काही संबंध आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवली असली, तरी अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप कायम आहे. या पदासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय गटांकडून चाचपणी सुरू असून, नेत्यांच्या हालचालींनाही वेग आला आहे. अशा संवेदनशील राजकीय टप्प्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक पातळीवरच व्हावा, अशी भूमिका शिवेंद्रसिंहराजे यांनी यापूर्वी मांडली होती. मात्र, महायुतीतील घटक पक्षांचे राजकीय हितसंबंध, इच्छुकांची वाढती संख्या आणि वरिष्ठ नेत्यांची भूमिका यामुळे अध्यक्षपदाची निवड अधिक गुंतागुंतीची बनली आहे. शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र, जिल्हा बँकेच्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे केवळ सदिच्छा भेट म्हणून पाहिले जात नाही. शिंदे यांची भूमिका, शिवेंद्रसिंहराजेंची राजकीय रणनीती आणि महायुतीतील समन्वय या तिन्ही बाबींच्या अनुषंगाने या भेटीचे अर्थ लावले जात आहेत. आगामी दि. १८ नोव्हेंबरच्या अध्यक्षपद निवडीपूर्वी झालेल्या या भेटीमुळे साताऱ्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळणार का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जावळी तालुकाही चर्चेत…?
जावळी तालुक्यातील राजकारणात महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील कुरबुरी वाढल्या आहेत. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावरही टीका केली आहे. जिल्हा बँकेप्रमाणेच शिवसेनेचे नेते म्हणून ना. एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीच्यावेळी जावळी तालुक्यातील राजकारणाबद्दल चर्चा झाली असावी, असाही अंदाज व्यक्त होत आहे.





