Satara: चारा झाला महाग आणि दूध उत्पादनात घट
Satara जिल्ह्यात यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत मोठा दु्ष्काळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सतर्कता बाळगली असली तरी या संकटावर सहजासहजी मात करणे शक्य नाही. दुष्काळसदृश्य परिस्थितीत माणसाबरोबर पशुपालकांवर पाण्याची भ्रांत येणारअसून सध्यस्थितीत जिल्ह्यात काही भागांत टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

Satara: जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुष्काळाची दाहकता असून दुष्काळाची झळ आता शेतातील पिकांपुरती मर्यादित न रहाता ती थेट पशुपालकांच्या कुटुंबाच्या अर्थकारणापर्यंत पोहोचली आहे. चारा घटल्याने विकतच्या चाऱ्यावरचा खर्च वाढला असून पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी दूध संकलन घटल्याने उत्पन्नातही घट झाली आहे. ‘चारा महागला आणि दूध घटले’ या दुहेरी संकटात जिल्ह्यातील पशुपालक सापडला असून या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत मोठा दु्ष्काळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सतर्कता बाळगली असली तरी या संकटावर सहजासहजी मात करणे शक्य नाही. दुष्काळसदृश्य परिस्थितीत माणसाबरोबर पशुपालकांवर पाण्याची भ्रांत येणारअसून सध्यस्थितीत जिल्ह्यात काही भागांत टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. त्याचा परिणाम आता पशुधन व्यवस्थापनावरही जाणवू लागला आहे. कमी किंवा अनियमित पावसामुळे हिरव्या चाऱ्याची उपलब्धता घटली असून पशुपालकांना बाहेरुन चारा खरेदी करावा लागत आहे. त्यासाठीचा खर्च वाढताना दिसत आहे. पाणी आणि चाऱ्याची कमतरता यामुळे जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी होत असून, दुग्धव्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे.
पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातील चारा उपलब्धता, अपेक्षित मागणी आणि पाण्याची गरज याचा प्रशासनाने तालुकानिहाय आराखडा तयार करण्याची गरज आहे. चारा डेपो, चारा छावण्या, पाण्याचे टँकर आणि पशुवैद्यकीय सेवा यांचे नियोजन वेळेत न झाल्यास उन्हाळ्यात पशुपालकांसमोरील संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या तीन तालुक्यात ५९ गावे ३२२ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून या पाण्यावर ७९ हजार ६४५ नागरिक आणि ६४ हजार ९४७ पशुधनाची तहान भागत आहे. १६ विहिरी व ९ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.
दुधाला फॅट कमी बसत असल्याने पशुपालकांना आता प्रतिलिटर केवळ ५० ते ५२ रुपये मिळत आहेत. यापूर्वी हाच दर ६० ते ६२ रुपये मिळत होता. त्यामुळे प्रत्येक लिटरमागे सुमारे आठ ते दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. पावसाअभावी चारा उपलब्ध होणे कठीण झाले असून, मिळणारा चारा चांगल्या प्रतीचा नसल्याने त्याचा परिणाम दूध उत्पादनासह फॅटवरही होत आहे. पाऊस कमी झाल्याने शेतात हिरवा चारा मिळत नाही. त्यामुळे विकत चारा विकत घ्यावा लागत आहे. चारा आणि पाण्याचा खर्च वाढला असताना जनावरांचे मात्र, दूध उत्पादन कमी झाले आहे. दुधाला फॅटही कमी बसत असल्याने दरात घट झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत प्रत्येक लिटरमागे कमी पैसे मिळत असल्याने जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. पुढील काळात चारा व पाण्याची उपलब्धता करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया दुष्काळी भागातून व्यक्त होत आहे.
या आहेत पुशपालकांपुढील समस्या
– गतवर्षापेक्षा चाऱ्याच्या दरात १५ ते २० टक्के वाढ
– एका कुटुंबाच्या उत्पन्नात दरमहा तीन हजारांची घट
– दोन जनावर रोजचे उत्पादन सहा ते सात लिटरवरून चार ते पाच लिटरपर्यंत कमी
– दूध संकलन घटल्याने पशुपालकांच्या मासिक उत्पन्नात घट
– चारा खर्च : ३५०० ते ४५००
– पाणी व वाहतूक : ५००
– पशुवैद्यकीय खर्च : १५००
– दूध विक्रीतून उत्पन्न : १०,५००
– निव्वळ उत्पन्न : ५,५००
यावर्षी दुष्काळाची तीव्रता जास्त दिसत असून दुष्काळामुळे यंदा हिरव्या चाऱ्याची उपलब्धता घटली आहे. पशुपालकांनी उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करुन पौष्टिक आहार आणि जनावरांना पुरेसे पाणी देणे आवश्यक आहे. तालुकानिहाय चारा व पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे.





