Satara | शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचा पोलीस दलाकडून सन्मान

ठोसेघर, (प्रतिनिधी) – मुसळधार पावसात मोठ मोठ्या दगड कपारीत सलग दहा दिवस शोध मोहीम राबवून केळवली धबधब्यात बुडालेल्या सैदापूर, ता. कराड येथील युवकाचा मृतदेह शोधून काढल्याबद्दल सातारा पोलीस दलाच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचे कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
सातारा येथील शिवतेज हॉलमध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नीलेश तांबे यांच्या हस्ते गुणगौरव करून प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचे चंद्रसेन लालासो पवार, सिद्धार्थ नरेंद्र गायकवाड,
आदित्य मुकुंद पवार, देवेंद्र विष्णू अडसूळ, गणेश विठ्ठल निपाने आदी रेस्क्यू टीमचे सदस्य यावेळी उपस्थित होते. शिवेंद्रसिंह रेस्क्यू टीमने या अगोदरही अनेक ठिकाणी आपत्ती काळात मोहीम राबवून आपले कौशल्य दाखवले आहे.
अडचणीच्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून इतरांना अडचणीतून मुक्त करण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न एखाद्या देवदूतासारखे आहेत. त्यांच्या या कार्याला आमच्या पोलीस दलाकडून शुभेच्छा आहेत रेस्क्यू टीमला जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे गौरवद्गार यावेळी पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी काढले.





