Shivendrasinhraje Bhosale: ३५ वर्ष जुनी समस्या अखेर मिटणार? शिवेंद्रसिंहराजेंनी पालिका प्रशासनाला दिले सक्त आदेश
Shivendrasinhraje Bhosale: सातारा शहराच्या विस्तारवाढीनुसार पायाभूत सुविधा देण्यावर भर; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी.

Shivendrasinhraje Bhosale – सातारा शहराच्या विस्तारवाढीनुसार त्या- त्या भागात आवश्यक असणारी विकास कामे मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सातारा पालिका प्रशासनाने प्राधान्य द्यावे. नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी यांनी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी शाहूपुरी रांगोळी कॉलनीतील सुरु असलेल्या जलतरण तलावाच्या कामाची तसेच चार भिंती परिसराची पाहणी केली. शाहूनगर मंगळाई कॉलनी येथील पाण्याच्या टाकीची पाहणी केली. शाहूपुरी येथील पवार कॉलनीत ५० लाख रुपये निधीतून बांधण्यात येत असलेल्या वाचनालय व अभ्यासिकेच्या इमारतीचे भूमिपूजन ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शाहूनगर येथील छत्रपती सुमित्राराजे भोसले सोसायटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १३५ व्या भागाचे श्रवण ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, बांधकाम सभापती विनोद खंदारे, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, उपसभापती सुजाता गिरीगोसावी, गटनेते अविनाश कदम, नगरसेवक अक्षय जाधव, राजू गोरे, विश्वतेज बालगुडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी उपस्थित होते.
पाहणी करून ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. सातारा शहराचा विस्तार वाढला असून अनेक ठिकाणी ३० ते ३५ वर्ष जुन्या पाइपलाइन असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. त्या- त्या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. तसेच नवीन पाणीसाठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. ज्या टाक्यांची कामे पूर्ण झाली असतील त्या टाकीतून पाणी वितरण सुरु करा, नागरिकांची पाणी समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, अशा सक्त सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना केल्या.





