प्रभात वृत्तसेवा मिरी : मोबाईल आमदार म्हणून ज्यांची संपूर्ण जिल्हाभरात ओळख होती, असे आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर मतदार संघातील विविध गावांमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले जात आहे. या शोकसभेतून कर्डिले यांच्या आठवणीमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.आ. कर्डिले यांनी केलेली मदत आणि विकास तसेच कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे कार्यकर्त्याला लावलेला जीव या आठवणींनी अनेकांना अश्रू दाटून येत आहेत. पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ, कोल्हार, डोंगरवाडी, गीतेवाडी, धारवाडी, डमाळवाडी, लोहसरसह परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रविवारी चिचोंडी येथे शोकसभा आयोजित केली होती. यावेळी सर्व व्यावसायिकांनी कडकडीत बंद ठेवून आमदार कर्डिले यांच्या निधनाचे दुःख व्यक्त केले.गेल्या पंधरा वर्षापासून आमदार कर्डिले राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिले. जनता दरबाराच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेच्या प्रश्नाची थेटपणे सोडवणूक केली. एक कॉल प्रॉब्लेम सॉल कार्यकर्त्यांने फोन केल्यानंतर ताबडतोब फोन उचलून त्या कार्यकर्त्याच्या प्रश्नांची सोडवणूक केली. विकास कामाबाबत दिलेला शब्द पूर्ण केला. अशा शब्दांत आमदार कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देत युवानेते अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका देखीलउपस्थित सर्व हितचिंतकांनी घेतली.यावेळी लक्ष्मण महाराज कराड, भगवान महाराज मचे, गणेश महाराज कुदळे, माजी सभापती संभाजी पालवे, मिरी-तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, माजी सैनिक शिवाजीराव पालवे मेजर, शिवाजी गर्जे मेजर, पद्माकर आव्हाड,माजी सरपंच बाबाजी पालवे, सरपंच श्रीकांत आटकर, रामनाथ शिरसाठ, किशोर पालवे, विठ्ठल गायकवाड,बब्बुभाई शेख यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.