Shivajinagar Assembly Election 2024 | खडकी परिसरातील विकासकामांना नागरिकांची साथ – सिद्धार्थ शिरोळे

पुणे :- जुन्या पुणे- मुंबई रस्त्याचे रुंदीकरण, खडकी- बोपखेल, बोपोडी- सांगवी यांना जोडणाऱ्या पुलांचे नव्याने बांधकाम, नदी सुधारणाअंतर्गत पाटील इस्टेट ते मुळा येथील नदीकाठचे सुशोभीकरण, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी नवीन ड्रेनेज लाइनचे हाती घेण्यात आलेले काम यांसारखी अनेक कामे मार्गी लावण्यासोबतच खास खडकी कॅन्टोन्मेंटमधील विकासकामांसाठी राज्य सरकारकडून आणलेला १५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी यामुळे खडकी कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांचा मला मोठा पाठिंबा मिळत आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केले.
शिरोळे यांची प्रचारार्थ खडकी भागात राजीव गांधी चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, राष्ट्रीय मित्रमंडळ, इंदिरा वसाहत, गवळी वाडा, दुर्गा वसाहत, पंकज मित्रमंडळ, इदगाह मैदान आणि राम मंदिर परिसरात पदयात्रा झाली. त्या वेळी नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी मी कायमच त्यांच्यासोबत असतो आणि म्हणूनच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील प्रश्न सोडविण्याला मी कायमच प्राधान्य दिले आहे, असे शिरोळे सांगतात.
विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपूल, पुणे मेट्रो, रस्त्यांचे रुंदीकरण, चाळीस दशलक्ष लिटर पाणी साठविले जाईल, अशा आठ ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या, आरोग्यसेवेसाठी एम्स संस्थेची उभारणी अशा अनेक महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश खडकी मतदारसंघात आहे. हे सर्व काम करत असताना सर्वसामान्य स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वाड्या- वस्त्यांवर शंभराहून अधिक कार्यक्रमांचे केलेले आयोजन, वेळीवेळी घेतलेल्या बैठका, चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यामुळेच खडकी भागातील नागरिकांना दिलास मिळू शकला आहे, असे शिरोळे म्हणाले.
नजीकच्या काळात खडकी रेंज हिल्स येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येईल. रेल्वे आणि महापालिकेशी संवाद साधत या प्रस्तावावर अंमलबजावणी करण्याचे ठरविले असून, त्यानुसार हा मार्ग सहावरून १८ मीटर करण्यात येणार आहे. यासोबतच पुणे रेल्वे स्थानकासोबत खडकी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचे देखील विस्तारीकरण करण्यात येईल. पुणे ते लोणावळा दरम्यान सध्याच्या दोन ऐवजी तीन ते चार मार्गिका करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याचेही काम सुरू होईल. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणारा अमृत भारत हा प्रकल्प झाल्यानंतर रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल, तसेच लोकल रेल्वेच्या फेऱ्याही वाढतील, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.
खडकी बोपोडी भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या परिसरात बंद झालेल्या पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असून, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेत सायबर सेलच्या माध्यमातून तक्रारींची सखोल चौकशी आणि उपाययोजना करण्याचा मुद्दा देखील विधानसभेत उपस्थित केला असल्याचे शिरोळे यांनी याप्रसंगी सांगितले.




