सातारा : अवघ्या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं अखेर आज साताऱ्यात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जात असून साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहेत. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे स्वागतासाठी दाखल ऐतिहासिक प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता सातारा जिल्हा हद्दीत दाखल झाली आहेत. आयशर गाडीतून ही वाघनखे पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल झाली. साताऱ्यात या वाघनखांच्या स्वागताला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. 19 तारखेला मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन शुक्रवारी सकाळी 11 वाजता सातारा येथे वाघनखं आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल, या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वतः सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहेत. 4 शहरांत ठेवण्यात येणार वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी राज्यात आली आहे ती सध्या सातारा येथे राहतील, ही वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या 4 शहरात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. कसे असणार प्रदर्शन ? शनिवारपासून (दि. २०) हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. वाघनखे सात महिने सातारा येथील संग्रहालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील. याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. हे प्रदर्शन एकावेळी दोनशे लोकांना पाहता येतील येईल. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये पहिला स्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे. तर दुपारी एकनंतर सर्व स्लॉट नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. प्रदर्शनात काय काय पाहता येणार ऐतिहासिक ‘वाघनखे’ हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. त्याचबरोबरच नागरिकांना शिवकालीन शस्त्र, वस्त्र, नाणी, तलवारी, बंदुका, भाल्यांचे विविध प्रकार, पट्टे, कुऱ्हाडी, कट्यारी, बाण, गदा यासह इतर दुर्मिळ वस्तू पहावयास मिळणार आहेत.