Satara | रस्त्याच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

म्हसवड, (प्रतिनिधी) – म्हसवडवरून काळचौंडीमार्गे झरेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षा पूनम माने यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील खड्डयात बेशरमची झाडे लावून आंदोलन करण्यात आले.
झरे कडे जाणाऱ्या या म्हसवड ते झरे रस्त्यावर जांभुळणी, काळचौंडीदरम्यान रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना विद्यार्थी, नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. या मार्गाने नेहमी वाळू व खडी भरलेल्या जड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची चाळणी झालेली आहे.
रस्त्याची दुरवस्था होऊनही संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून, त्यांच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, ये-जा करण्यासाठी आवश्यक रुंदीच्या रस्त्याचे तातडीने काम करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाने संबंधित विभागास लेखी निवेदन देऊनही काही उपाययोजना न केल्याने हे आंदोलन करण्यात आले.





