Shiv Sena UBT : ‘मुस्तफिजूरची KKR मधून हकालपट्टी करा, अन्यथा IPL…’, शिवसेनेचा (ठाकरे) शाहरुखसह BCCIला इशारा

Shiv Sena UBT warns Shah Rukh Khan KKR : बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांचे तीव्र पडसाद आता भारतीय क्रिकेट वर्तुळात उमटू लागले आहेत. आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले आहे. मात्र, या निवडीवरून आता मोठा राजकीय आणि धार्मिक वाद निर्माण झाला असून, मुस्तफिजूरला तातडीने संघातून काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे.
शिवसेनेचा (ठाकरे गट) आक्रमक पवित्रा –
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मुस्तफिजूर रहमानच्या निवडीवर जोरदार आक्षेप घेतला आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा प्रश्न केवळ खेळाचा नसून राष्ट्रीय सुरक्षेचा आणि देशाच्या स्वाभिमानाचा आहे.
#WATCH | Mumbai: On KKR selecting a Bangladeshi player in the IPL auction, Shiv Sena (UBT) spokesperson Anand Dubey says, “…Bangladeshi players shouldn’t be allowed to play on Indian soil in the IPL… Pakistani and Bangladeshi players should be prohibited. They harbour hatred… pic.twitter.com/2niILDRPwq
— ANI (@ANI) January 2, 2026
“बांगलादेश आणि पाकिस्तानचा डीएनए एकच आहे. तिथे आपल्या हिंदू बांधवांची हत्या होत असताना आपण त्यांच्या खेळाडूंना भारतात खेळवून त्यांचे लाड का करायचे? जोपर्यंत हे देश भारताची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी क्रीडा, सांस्कृतिक किंवा व्यापारी कोणतेही संबंध ठेवू नयेत,” असे दुबे यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा – IND vs BAN : मोठा बातमी! हिंदूंच्या नरसंहारानंतरही भारत बांगलादेशात क्रिकेट खेळणार? मालिकेचे वेळापत्रक जाहीर
शाहरुख खानला ‘देशभक्ती’ सिद्ध करण्याचा इशारा –
आनंद दुबे यांनी केकेआरचा मालक आणि अभिनेता शाहरुख खानला थेट आवाहन केले आहे. “शाहरुख खानने कोणत्याही दबावाशिवाय स्वतःहून त्या बांगलादेशी खेळाडूची हकालपट्टी करावी. असे केल्यास ते त्यांच्या देशभक्तीचे प्रतीक ठरेल. या देशात राहून पैसे कमवणाऱ्यांनी देशाच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
धार्मिक नेत्यांचा इशारा: ‘खेळपट्टी उखडून टाकू’
केवळ राजकीयच नव्हे, तर धार्मिक क्षेत्रातूनही या दौऱ्याला आणि खेळाडूंना विरोध होत आहे. उज्जैनच्या रिंमुक्तेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी महावीर नाथ यांच्यासह अनेक साधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर बांगलादेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरले, तर ‘धार्मिक योद्धे’ मैदानात घुसून सामने बंद पाडतील आणि खेळपट्टी उखडून टाकतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
९.२० कोटींची बोली अन् सोशल मीडियावर बहिष्काराचे अस्त्र –
नुकत्याच झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजूरवर ९.२० कोटींची मोठी बोली लावली होती. मात्र, बांगलादेशातील हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर सोशल मीडियावर ‘Boycott KKR’ आणि ‘Boycott IPL’ असे ट्रेण्ड सुरू झाले आहेत. एका बाजूला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने २०२६ च्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले असताना, दुसरीकडे भारतातील हा वाढता विरोध बीसीसीआय आणि फ्रँचायझींसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.





