शिवसेना ठाकरे गटाला धक्का; लोकसभा उमेदवारानंतर आता विधानसभा उमेदवाराचा जय महाराष्ट्र

अमरावती: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला अमरावतीत मोठा धक्का बसला आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (मविआ) उमेदवार सुनील खराटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. मंगळवारी (१० जून) मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह खराटे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता आहे.
बडनेरा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत खराटे यांना केवळ ७,१२१ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार रवी राणा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. प्रीती बंड यांना ६०,८३६ मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर खराटे यांनी ठाकरे गट सोडला. अमरावतीत माजी जिल्हाप्रमुख असलेल्या खराटे यांच्या जाण्याने ठाकरे गटाला खिंडार पडले आहे.
दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटातून निवडणूक लढवलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. क्रीडा क्षेत्रातील प्रश्न आणि खेळाडूंच्या मागण्यांसाठी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील नेत्यांचे पक्षांतर महाविकास आघाडीसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. यामुळे स्थानिक निवडणुकीत मविआला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.





