विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून ‘या’ तीन नेत्यांच्या नावांची चर्चा

मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास 3 महिने झाले आहेत. मात्र अजूनही विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एखाद्या पक्षाला एकूण जागांपैकी 10 टक्के जागा मिळवणे आवश्यक असते. मात्र विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपदाला लागणारी सभासद संख्या देखील विरोधी पक्षाला गाठता आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाचा पेच कायम होता.
शिवसेना ठाकरे गटाकडून 25 नोव्हेंबर 2024 ला विधीमंडळ सचिवालयाला पत्र देऊन विरोधी पक्ष नेते संदर्भात नियमावली मागवली होती. यासंदर्भात विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विवक्षित तरतूद नाही असे उत्तर विधीमंडळ सचिवांनी दिले आहे. संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा सांगोपांग विचार करून अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा हे आपल्या अधिकारात विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा यांच्या नियुक्तीसंदर्भात निर्णय घेत असतात, असेही विधीमंडळ सचिवांनी म्हटले आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते पदावर आमचा हक्क असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेते पदाची मोठी परंपरा आहे. राज्यातील विरोधी पक्षाने अचूक कामगिरी पार पाडलेली आहे. तुम्ही निवडून आला आहात मात्र तुमचा विजय संशयास्पद असला तरीही विधानसभेत विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय लोकशाही विधिमंडळ पक्षाला दिशा सापडणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राज्याला विरोधी पक्ष नेता नसेल तर मंत्र्यांची मनमानी चालू राहील, भ्रष्टाचारी मोकाट सुटतील, त्यांना व्यसन घालण्यासाठी विरोधी पक्षाची तरतूद करण्यात आली असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असा कोणताही नियम नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अनेक राज्यात चार-पाच सदस्य असलेल्या पक्षांना देखील लोकशाहीची बूज राखण्याकरिता विरोधी पक्ष नेते पद मिळाले असल्याची परंपरा आहे. महाविकास आघाडीचे एकत्रित मिळून तर 50 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे ते म्हणाले.
विरोधी पक्ष नेते नेतेपद देणे ही सरकारची जबाबदारी –
विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल तर भ्रष्टाचार वाढेल, असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला आहे. देशातील अनेक राज्यात पाच सदस्य असताना देखील विरोधी पक्षनेतेपद दिले गेले असल्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात तर विरोधी पक्षांकडे एकत्रित 50 आमदारांचे संख्याबळ असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र विरोधी पक्ष नेत्यांचा निर्णय हा पत्रकार परिषदेत होत नसतो. त्यासाठी विधिमंडळ विरोधी पक्ष हा अधिवेशनात पोहोचले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला एक परंपरा आहे. त्यानुसार विरोधी पक्ष नेते नेतेपद देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते पदासाठी 3 नावांची चर्चा
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा होत आहे. ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीत विरोधीपक्षनेते पदासाठी कोणाच नावं अंतिम करायचं? यावर देखील चर्चा झाली होती. मात्र विरोधी पक्षनेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच स्पष्ट होईल.





