शिवसेना राज्यात सर्वात लाचार पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस

रायगड: आज शिवस्वराज्य यात्रेच्या चौथ्या टप्प्याला कर्जत, जिल्हा रायगड येथे सुरूवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी राज्यातील नाणार प्रकल्पावर होणाऱ्या विरोधावर भाष्य केले. तसेच मुंबईतील आरे वृक्षतोडीबाबत आदित्य ठाकरे विरोध करतात पण मुख्यमंत्री प्रकल्प होणार, असा दावा करतात.

राज्यात फडणवीस सरकार आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असतानाही प्रकल्पासंदर्भात विरोधाभास दिसतो, त्यामुळे राज्यात चाललंय तरी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सरकारकडे बोलायला विकासाचे मुद्दे नाहीत. शेतकरी आत्महत्येचा आकडा १६ हजारांवर पोहचला आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी काय केलं? एरवी स्वाभिमानाची भाषा शिवसेना करते. पण आज राज्यात सर्वात लाचार पक्ष म्हणून शिवसेना पक्षाची चर्चा होत असल्याचे मिटकरी म्हणाले.

एक काळ असा होता की बाळासाहेबांनी मुंबईत आवाज केला तर त्याचे परिणाम दिल्लीत व्हायचे. पण आता गुजरातमध्ये जाऊन जय गुजरात बोलावं लागतंय, हे दुर्दैव आहे, अशी जहरी टीका मिटकरी यांनी केली. शिवाय राज्यात धर्म जातीवरून राजकारण होत आहे. मुस्लिम बांधवांना शत्रू म्हणवतं आहे, अशी परिस्थिती फडणवीस सरकारने निर्माण झाली असल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.