शिवसेना आमदार अपात्रतेची उद्या सुनावणी ! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले,”दिल्लीत एक..”

मुंबई – शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील (Shiv Sena MLA disqualification) सुनावणी उद्या म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. यापूर्वी शिवसेना आमदार अपात्रेतसंदर्भातील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार होती. पण राहुल नार्वेकरांना दिल्लीतील कार्यक्रमासाठी जायचे असल्याने एक दिवस आधी म्हणजे उद्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे, अशी माहिती त्यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना दिली आहे.
शिवसेना आमदार (Shivsena mla) अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर म्हणाले, दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते होणार आहे. त्या कार्यक्रमाचे मला आमंत्रण आल्यामुळे त्या कार्यक्रमात उपस्थित राहणे आवश्यक आहे. यामुळे आता ही सुनावणी उद्या म्हणजे 12 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.
मला आमदार अपात्रतेविषयात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. मला कोणताही वेळ वाया घालवायचा नाही म्हणून एक दिवस आधी ती सुनावणी घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, अशी माहिती नार्वेकरांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेनेतील फूटीवर सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही 5 महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. गेल्या महिन्यात अध्यक्षांकडून सुनावणी घेण्यासाठी वेळकाढूपणा केला जात असल्याची तक्रार करत विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने अध्यक्षांना याबद्दल फटकारले. त्यानंतर सुनावणीचे वेळापत्रक अध्यक्षांनी जाहीर केले.





