संजय राऊतांमुळे शिवसेनेने विश्वसनीयता गमावली; किशोर तिवारी यांचा आरोप

नागपूर : संजय राऊत पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाही, ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यांच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विश्वसनीयता खालावली आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता पदावरून नुकतीच हकालपट्टी झालेल्या किशोर तिवारी यांनी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर देत ठाकरे सेनेतील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
आपल्या हकालपट्टीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की मी कार्यक्रमात सहभागी झालो होतो. वाहिनीचा तो कार्यक्रम 8:30 वाजता संपला आणि 8:45 ला पक्ष प्रवक्ता पदावरून माझ्या हकालपट्टीचा आदेश निघाल्याचा गौप्यस्फोटही किशोर तिवारी यांनी केला आहे. एवढेच नाही तर निवडणुकीच्या काळात प्रवक्ता असतानाही मला प्रसारमाध्यमांवर हिंदुत्वाची लाईन घेण्यापासून रोखण्यात आले होते.
कारण मुंबईत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी मुस्लिमांचे मतदान आवश्यक होते. त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका मांडण्यापासून पक्षाकडून थांबवण्यात आल्यास गंभीर आरोपही किशोर तिवारी यांनी केला आहे. नागपुरात येऊन संजय राऊत यांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि दुसऱ्या दिवशीपासून पक्षाला गळती लागली.
नागपुरातून आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू दुष्यंत चतुर्वेदी यांनी संजय राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेमुळेच पक्ष सोडल्याचे तिवारी म्हणाले. राजन साळवी पक्ष सोडून गेल्यानंतरही पक्षात कोणालाही जाग आलेली नाही. ज्याला जायचं आहे ते जा, कोणाच्या जाण्याने काही फरक पडत ही, पक्षाची अशी भूमिका आत्मघाती असल्याचा इशाराही तिवारी यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पैसे खर्च करून किमान दहा वेळेला मुंबईला गेलो. मात्र कधीच उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. उलट हाकलून लावण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी कधीच संवाद साधला नाही. फक्त एकदा भेटले आणि मला तुमच्याशी शांतपणे भेटायचे आहे, असे सांगितले. मात्र शांतपणे भेटण्याची ती वेळ आजवर आली नाही, अशी खंत ही तिवारी यांनी बोलून दाखवली.





