“मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते…” शिवसेनेचा भाजपवर थेट निशाणा

मुंबई – शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजपा आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. अशा शब्दात शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर निशाणा साधला आहे.
मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले. ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा ! बाकी सारे शिवतीर्थवरच असा शाब्दिक हल्ला करत शिवसेनेने दसऱ्या मेळाव्याचा सूतोवाच देखील सामनाच्या संपादकीयमधून केला आहे.
हे वीर न शिवरायांचे जे शरण भराभर गेले,ही झुंज फंदफितुरीची ! हा गनिमी कावा पैसा ? या सुरेश भट यांच्या ओळी आजच्या राजकीय परिस्थितीला तंतोतंत लागू होताता असे देखील सामनात म्हंटले आहे. ब्रिटिशाना जे हवे होते मोघलांना जे घडवायचे होते ते भाजपवाले मराठीजणांकडून घडवू पाहत आहेत. फोडा,झोड आणि मजा पाहत रहा अशी भाजपाची नीती आहे असे म्हणत सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.





