Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुखांना भारतरत्नने सन्मानित केले जावे; ठाकरेसेनेची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्याची मागणी ठाकरेसेनेने गुरूवारी केंद्र सरकारकडे केली. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे औचित्य साधून ती मागणी पुढे करण्यात आली.
ठाकरसेनेचे नेते संजय राऊत यांनी संबंधित मागणी करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही भारतरत्नने गौरवण्यात आले नसल्याकडे लक्ष वेधले. केंद्र सरकारने मागील १० वर्षांत ज्यांना सन्मानित केले; त्यातील काही जण भारतरत्नसाठी पात्र नव्हते, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. हिंदूहृदयसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना भारतरत्नने सन्मानित केले जायलाच हवे.
त्यांनी खऱ्याअर्थी देशात हिंदुत्वाची बीजे रोवली. त्यांनी हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. त्यामुळे त्यांना गौरवण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ठाकरेसेनेचे आणखी एक नेते अरविंद सावंत यांनीही ती मागणी उचलून धरली. केंद्रातील सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेतले. त्या सरकारने शिवसेनाप्रमुखांचा उचित सन्मान करायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.





