Nagar | खासदार लंकेच्या विजयामध्ये शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा

पारनेर, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या काळात पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आपण जुन्या-नव्या सैनिकांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळेच लोकसभेच्या निकालामध्ये खासदार नीलेश लंके यांच्या विजयात पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या भगवा सप्ताहनिमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेच्या शुभारंभप्रसंगी टाकळी ढोकेश्वर येथील कार्यक्रमात गाडे यांनी पारनेरचे शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
डॉ.श्रीकांत पठारे हे पारनेर तालुक्याचे भूषण असून लोकसभा निवडणुकीत डॉ.श्रीकांत पठारे यांच्या कामाची व संघटन कौशल्याची चुणूक पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात आलेली असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा हक्काने महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला ठेवणार असल्याचे सूचक विधान जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले.
शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. यानिमित्ताने पारनेर तालुक्यात मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख गुलाबराव नवले,
जेष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किसन सुपेकर, संतोष साबळे, संतोष येवले, उजागरे , बाबा रेपाळे, सरपंच रामदास खोसे, सुनिता मुळे, देवराम मगर, धनंजय निमसे, दिपक मावळे,
नितीन आहेर, अनिकेत देशमाने, अक्षय गोरडे, शुभम गोरडे, सुयोग टेकुडे, तानाजी मुळे, मोहन पवार, मुकेश गवळी, डॉ.नीता पठारे, मंगल पठारे, राजू बोरूडे, अक्षय दुश्मन, रामेश्वर ठाणगे,अशोक चौधरी, अभिजीत पवार यांसह मोठ्या संखेने शिवसैनिक उपस्थित होते.
डॉ.श्रीकांत पठारे यांनी भगवा सप्ताह व मशाल यात्रेबाबत माहिती समजावून सांगत संपूर्ण ताकतीने पारनेर तालुक्यात सर्व शिवसैनिक जोमाने उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी मशाल यात्रेच्या माध्यमातून जोमाने प्रचार करणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
शिवसैनिक लागले विधानसभेच्या तयारीला
पारनेर तालुका हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे मोठं संघटन असून, अनेक सर्वसामान्य शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विचारांना मानून काम करतात.
भगवा सप्ताह व मशाल यात्रेच्या माध्यमातून पारनेरमध्ये शिवसैनिक शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी व पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार करण्यासाठी कामाला लागले आहेत.




