satara | पाचगणीत शिवजयंती उत्साहात साजरी

भिलार, (वार्ताहर) – ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष… अग्रभागी मुख्य रथावर असणारी शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भव्य अभिषेक… अशा स्फूर्तिदायी अन् ‘शिवमय’ वातावरणात शुक्रवारी (दि. 9) पाचगणी शहरात शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली.
पाचगणी येथे शिवजयंती उत्सव समिती, पांचगणी व परिसर यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेतील सोहळ्याचे. पांचगणी आणि परिसरातील मंडळानी विविध किल्ल्यावरून आणलेल्या शिवाज्योतीनी पाचगणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपापल्या गावांकडे प्रस्थान केले. यामुळे पाचगणीचा छ्त्रपती शिवाजी महाराज चौक शिवमय वातावरणाने न्हाऊन गेले होते.
सायंकाळी सहा वाजता बेबी पॉइंट येथून या भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला ही शोभा यात्रा शासकीय दवाखाना, बस स्टँड ते चौकात कार्यक्रम स्थळी आली. या ठिकाणी पारंपरिक पोशाख आणि फेटे परिधान केलेल्या महिला सर्वांचेच आकर्षण ठरले होते.
या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशा पथकाने मिरवणुकीत जल्लोषपूर्ण वादन केले. व महिलांच्या नृत्याना व वादनाला वेळोवेळी टाळ्यांच्या उत्स्फूर्त गजरात दाद मिळत होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.





