राज्यात 26 जानेवारीपासून दहा रुपयांत शिवभोजन

मुंबई – राज्यातील गरीब व गरजूंना प्रत्येक जिल्ह्यात 10 रुपयांत शिवभोजन देण्याची घोषणा मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीपासून या योजनेची अंमजबजावणी सुरु करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दिले. त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवभोजन थाळी मिळणार आहे.
2019मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या वचननाम्यात राज्यात स्वस्त व सकस जेवणाची केंद्र सुरु करण्याचे वचन दिले होते. नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीबांसाठी 10 रुपयांत शिवभोजन थाळी देण्याची घोषणा केली. नागपूर अधिवेशनातील या घोषणेनंतर दोनच दिवसांत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती आणि शिवभोजनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
गरीबांना सकस आहार देणाऱ्या शिवभोजन योजनेचीही सुरुवात होत असून याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यानुसार आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शिवभोजन’ दिले जाणार आहे. शिवभोजन योजनेला सुरुवात करण्यात येत असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात शिवभोजन दिले जाणार आहे.





