पुणे जिल्हा: महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट झाली गायब

सविंदणे – महिलेने घरातील फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना रामलिंग (ता. शिरूर) येथे सोमवारी (दि. 8) घडली. अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय 33) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड (रा. श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा जि. नगर) यांनी याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानदेव गायकवाड यांना (दि .08) रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान त्यांची मुलगी शलाका सुपेकर (रा. श्रीगोंदा) यांनी फोन करुन अंजली ज्ञानदेव गायकवाड हिने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर ते त्यांची पत्नी, मुलगी शलाका सुपेकर यांच्यासह शिरुर येथील वेदांता हॉस्पीटल येथे गेले. त्यावेळी वेदांता हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी त्यांची मुलगी अंजली गायकवाड हिचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी शिरुर पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दाखल केली.
आत्महत्येपुर्वी महिलेने लिहिलेली सुसाईड नोट गायब…?
अंजली गायकवाड यांनी आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहिली होती. परंतु शिरुर पोलिसांना ती सापडली नाही. त्यामुळे या प्रकरणात गुंतागुंत वाढण्याची शक्यता असुन या सुसाईड नोटमध्ये शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC मध्ये बांधकाम व्यवसाय करणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्या व्यक्तीच्याच जवळच्या काही व्यक्तींनी ही सुसाईड नोट गायब तर केली नाही ना ? असा संशयही काहीजण व्यक्त करत आहे.





