Shirur Uran Corridor : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला तगडा पर्याय! शिरूर-चाकण-उरण कॉरिडॉरला अखेर मंजुरी..पाहा कसा असेल मार्ग?
Shirur Uran Corridor : आमदार बाबाजी काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; चाकण आणि शिरूर एमआयडीसीतील मालवाहतूक आता थेट बंदराशी जोडली जाणार.

Shirur Uran Corridor – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि औद्योगिक मालवाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण मल्टिनोडल कॉरिडॉरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी ही माहिती दिली.
सुमारे 135 किलोमीटर लांबीचा आणि चारपदरी असणारा हा कॉरिडॉर राज्यातील औद्योगिक, व्यापारी आणि वाहतूक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मार्गामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर रोड परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला प्रभावी पर्याय उपलब्ध होणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सतत होणार्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, उद्योग क्षेत्र आणि मालवाहतूकदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः चाकण आणि शिरूर एमआयडीसी परिसरातून होणारी कंटेनर वाहतूक आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठा ताण निर्माण होत होता.
त्यामुळे स्वतंत्र आणि वेगवान पर्यायी मार्गाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. याच पार्श्वभूमीवर आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा सभागृहात वारंवार हा मुद्दा उपस्थित करत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिल्याने औद्योगिक क्षेत्रासह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या कॉरिडॉरमुळे शिरूर आणि चाकण एमआयडीसीतील औद्योगिक मालवाहतूक थेट उरण येथील जेएनपीटी बंदराशी जोडली जाणार आहे. त्यामुळे निर्यात-आयात प्रक्रियेला गती मिळणार असून उद्योग क्षेत्रासाठी वाहतूक खर्च आणि वेळ दोन्ही कमी होणार आहेत. तसेच मालवाहतुकीसाठी पुणे शहरात प्रवेश करण्याची गरज कमी होणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीत 70 ते 80 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाहतूक सुलभतेसोबतच या प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक गुंतवणुकीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या, उद्योग विस्तार आणि लॉजिस्टिक नेटवर्क लक्षात घेता हा कॉरिडॉर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या प्रकल्पामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून रोजगारनिर्मिती, औद्योगिक वाढ आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. मुंबईला जोडणारा पर्यायी द्रुत मार्ग उपलब्ध होणार असल्याने नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
“मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीला पर्याय निर्माण व्हावा यासाठी सभागृहात सातत्याने आवाज उठवला. हा प्रकल्प केवळ खेड तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास यामुळे मोठी मदत होईल. तसेच खेड तालुक्याच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासालाही या कॉरिडॉरमुळे नवे बळ मिळेल.”
– बाबाजी काळे, आमदार
कॉरिडॉरमुळे होणारे प्रमुख फायदे
-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार
-चाकण व शिरूर एमआयडीसीतील मालवाहतुकीला वेग
-जेएनपीटी बंदराशी थेट संपर्क
-उद्योग क्षेत्राचा वेळ व खर्च वाचणार
-पुणे शहरातील कंटेनर वाहतूक कमी होण्यास मदत
-रोजगार व औद्योगिक गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता






