Shirur : फेरफारच्या नकला मिळवण्यासाठी नागरिकांची फरफट; अभिलेख कक्षातील अनधिकृत वावरावर प्रश्नचिन्ह
Shirur : शिरूर तहसील कार्यालयातील फेरफारच्या नकलांना विलंब होत असल्याचा आरोप. अभिलेख कक्षातील अनधिकृत वावराची चौकशी करून कारवाईची मागणी.

Shirur : शिरूर महसूल विभागाच्या अभिलेख शाखेतील दिरंगाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फेरफारच्या नकला आणि इतर आवश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दत्तात्रय पडवळ यांनी ४ ऑगस्ट रोजी, तर सुरेश भुजबळ यांनी १३ ऑगस्ट रोजी फेरफारच्या नकलीसाठी अर्ज केला. मात्र, अद्यापही त्यांना संबंधित कागदपत्रे मिळालेली नाहीत, असा दावा अॅड. सागर दरेकर यांनी केला आहे. महसूल सहाय्यक संजू गोणे यांच्याकडून या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महसूल विभागाने नागरिकांना नियमानुसार आणि वेळेत कागदपत्रे उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने नागरिकांना पुन्हा-पुन्हा तहसील कार्यालयात यावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘शासकीय कार्यालयात काम करून घेण्यासाठी नागरिकांनी किती हेलपाटे मारायचे?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
अभिलेख कक्षाबाहेर नागरिकांच्या बसण्यासाठी असलेले बाकडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही योग्य नसल्याची तक्रार आहे.
तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात फेरफार, जुने अभिलेख आणि महसूलविषयक महत्त्वाची कागदपत्रे जतन केली जातात. त्यामुळे या कक्षात अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मात्र, अभिलेख कक्षात विनापरवाना अनेकांचा वावर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराची जबाबदारी महसूल सहाय्यक संजू गोणे यांच्यावर निश्चित करून त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी. दोष आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. सागर दरेकर यांनी केली आहे.
फेरफारच्या नकला, उतारे आणि इतर महसूल कागदपत्रे जमीन व्यवहारांसाठी महत्त्वाची असतात. त्यामुळे अर्ज करूनही कागदपत्रे वेळेत न मिळणे आणि नागरिकांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागणे, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
शिरूर तहसील कार्यालयातील या प्रकाराची तातडीने चौकशी करून प्रलंबित फेरफारच्या नकलांसह आवश्यक कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करून द्यावीत. तसेच अभिलेख कक्षातील अनधिकृत वावराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या कामासाठी असलेल्या महसूल कार्यालयातच नागरिकांची फरफट होत असेल, तर ‘शासन आपल्या दारी’ या घोषणेचा अर्थ काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





