शिरूर : शहरात आज सात कोरोना बाधित रूग्णांची भर

शिरूर (प्रतिनिधी) : शहरातील प्रीतम प्रकाश नगर ,हलवाई चौक, कापड बाजार, बीजे कॉर्नर , स्टेट बँक कॉलनी या भागात आज सात कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यात एक कंपनी कामगार व एका डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली.
शिरूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठेतील कापड बाजार व हलवाई चौक या भागात प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील मुख्य बाजारपेठ आता हादरून गेली आहे. आज शिरूर येथील कोविड सेंटर येथून 54 जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने घेण्यात आले आहेत.
शिरूर शहरातील प्रीतम प्रकाश नगर येथील 84 वर्षीय वृद्धाला, हलवाई चौक येथील 62 वर्षीय पुरुषाला, कापड बाजार येथील 30 वर्षीय महिलेला, बीजे कॉर्नर येथील 47 वर्षीय पुरुष, कैकाडी आळी येथील 60 वर्षीय पुरुष, स्टेट बँक कॉलनी येथील 31 वर्षीय कंपनी कामगार, तर एका 32 वर्षीय डॉक्टरला ही कोरोनाची लागण झाली आहे.
शिरूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत कोरोनाचा पहिला रुग्ण कापड बाजार येथे निघाला आहे. त्यामुळे आता शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यासाठी आता नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
शिरूर शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक ठिकाणी नागरिक गंभीर नसून शहरातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी सर्वांनी मास्क वापरावे, गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सं पाळावे, यासारख्या शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू त्यासाठी नगर परिषदेस व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक यांनी सहकार्य करावे असे आवाहन मुजफ्फर कुरेशी(नगर परिषद पाणीपुरवठा सभापती )यांनी केले आहे.
शिरूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व नगरपालिका कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असून समाजातील समाजसेवी ,स्वयंसेवी ,समाजकार्य करणाऱ्या तरुणांनी कोरोना योद्धा म्हणून काम करण्यासाठी शिरूर नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन शिरुर नगर परिषद मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.





