Shirur Satyagraha : शिरूरमध्ये गुन्हेगारीविरुद्ध ‘रणशिंग’! नीलेश वाळुंज यांचा बेमुदत सत्याग्रह; शहराला ‘भाईगिरी’चा विळखा?
Shirur Satyagraha : राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारेंची भेट घेऊन सत्याग्रहास सुरुवात; एक गाव-एक पोलीस अंमलदार योजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी.

Shirur Satyagraha – शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर परिस्थितीकडे शासन व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळुंज यांनी बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. बुधवार (दि. 15) पासून तहसीलदार कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, शहरासह तालुक्यात या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
शहरात एमडी (मेफेड्रोन) सारख्या घातक अमली पदार्थांचा वाढता विळखा तरुणाईला ग्रासत असून, हातभट्टी दारू, अवैध धंदे, जुगार, मटका, चोरीच्या घटना, दादागिरी व भाईगिरी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सत्याग्रह सुरू करण्यापूर्वी नीलेश वाळुंज यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.
शिरूरमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली असून, हजारे यांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनातून काही महत्त्वाच्या मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक गाव, एक पोलिस अंमलदार योजना प्रभावीपणे राबवणे, शिरूरसाठी कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) व शिरूर,
शिक्रापूर पोलिस ठाण्यांसाठी सक्षम पोलिस निरीक्षकांची नेमणूक करणे, शिरूर शहरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करणे, अण्णापूर गाव टाकळी हाजी दूरक्षेत्राऐवजी शिरूर पोलिस ठाण्याला जोडणे तसेच शिरूर पोलिस ठाण्यासमोर झालेल्या राड्याची सखोल चौकशी करणे, अशा मागण्यांचा समावेश आहे. या सत्याग्रहाला स्थानिक नागरिकांकडून हळूहळू पाठिंबा वाढत असून, विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नीलेश वाळुंज यांनी दिला आहे.
तहसीलदारांची भेट
दरम्यान, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि प्रत्यक्षात कोणत्या उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






